thumb podcast icon

Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi Podcast

U • Arts

मराठी भाषचं भविष्य वैगरे अश्या मोठं मोठ्या विषयांवर आपण भाष्य करणार नाही आहे, पण रोजच्या बोली भाषेत सोप्या शब्दांसाठीही आजकाल इंग्रजी शब्द वापरले जातात, त्याचा काय परिणाम होतो ह्याचं एक उदाहरण पाहूया. आता पहा लाल भोपळा किंव्हा ज्याला आमच्या विदर्भात डांगर म्हणतात त्याचं नाव आलं की डोळ्यासमोर कशी रस्सेदार चमचमीत भाजी येते तेच त्याला pumpkin म्हंटलं तर कदाचित pumpkin pie वगैरे पदार्थ डोळ्यासमोर येतील.मुद्दा एवढाच आहे की भाषा आणि संस्कृती ह्याचा खूप जवळचा संबंध आहे.. आणि म्हणूनच विस्मरणात चाललेले काही शब्द आणि त्याच्या बद्दलच्या गप्पा करायला येत आहोत आपल्या पॉडकास्ट मध्ये..

 • शब्दांचे जीवनचक्र
  12 min 34 sec

  शब्दांचे जीवनचक्रप्रा डॉ श्रीकांत तारे माणसांप्रमाणे शब्दांचेही जीवनचक्र असते. शब्द जन्माला येतात,जगतात व शेवटी मरुन जातात. काही शब्द शतायुषी माणसाप्रमाणे पिढ्‌यान पिढ्‌या सन्मानाने जगतात. काही शब्द अल्पायुषी ठरतात, तर काही शब्द उगाचच श्वास चालला आहे म्हणून जिवंत म्हणवले जातात, एरवी त्या शब्दांकडे सहसा कुणी लक्षही देत नाही.

 • बनियान
  4 min 32 sec

  मराठी भाषा वाचतांना भाषेच्या शब्दडोहात बुडी मारण्याचा एक छंद लागला आहे. अर्थात हे मी असे नेहमीच करतो असे नाही. पण ज्यावेळी करतो त्यावेळी नेहमीच जे हाताला लागते त्याने मन आश्चर्य चकित होते. साधारण एक आठवड्यापुर्वी आंघोळ झाल्यावर बनियान लवकर सापडले नव्हते. झालं हा शब्द चांगलाच डोक्यात बसला. मग झाली शोध यात्रेला सुरुवात. हा शब्द इंग्रजी, हिंदी, संस्कृत,मराठी यातुन निर्माण झाला असावा असा कयास होता. यांतही इंग्रजी, हिंदी, मराठी, संस्कृत यापैकी कुठल्या तरी शब्दांचा संकर असावा असे वाटत होते. यामुळे इंग्रजीमराठी शब्दकोश, मराठीइंग्रजी शब्दकोश, संस्कृत मराठी शब्दकोश, मराठीमराठी शब्दकोश, इंग्रजीइंग्रजी शब्दकोश, हिंदी मराठी शब्दकोश तसेच हाताला लागतील तेवढी पुस्तके यांची खंगाळणी केली. यातुन जी माहिती प्राप्त झाली. ती उद्बोधक होती. त्यातुन या शब्दामागे बनिया हा शब्द असल्याचे लक्षात आले. बनिया हा शब्द हिंदी/बंगाली आहे व तो संस्कृत शब्द वाणिज्य या शब्दावरून आला आहे. बनिया लोक अंगात जी सुती बंडी बंडी हा देखिल संस्कृत मधून आला आहे. घालत त्यावरून इंग्रजांनी त्याचे इंग्रजीकरण करून बनियान हा नविन शब्द निर्माण केला.   गुजराथी व्यापारी पुर्वी वडाच्या झाडाखाली मंदिर बांधत. वडाच्या झाडाला इंग्रजीत Baniyan tree म्हणतात. यावरून हे लक्षात येते कि, बनिया या हिंदी/बंगाली शब्दातून बनियान असे इंग्रजीकरण केले गेले आहे. पुर्वी बनियान याला समांतर गंजिफ्राॅक हा शब्द ही वापरला जायचा. आता तो सहसा वापरला जात नाही. हा शब्द गाॅज gauze या इंग्रजी शब्दावरून घेतला व  त्याचे मराठीकरण गंजिफ्राॅक सच्छिद्र पातळ कापडाचा फ्राॅक असे केले गेले.  म्हणजेच बनियान हा शब्द हिंदी/ बंगालीतून, इंग्रजीत तर गंजिफ्राॅक हा शब्द इंग्रजीतून, मराठीत आला. अशी आहे ही शब्दांची हेराफेरी.

 • पगडी, पागोटे व जिरेटोप
  6 min 3 sec

  पगडी, पागोटे व जिरेटोपजगातील पुरूषांकडून डोके झाकण्यासाठी विविध साधनांचा/वस्तुंचा वापर पूर्वपरंपार आहे. त्यांची नांवेही वेगवेगळी आढळतात .पगडी,पागोटे,फेटा अशी त्यातली कांही नांवे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, पारसी व अन्य अनेक धर्मात शुभ प्रसंगी डोके झाकणे अनिवार्य असते. स्त्रीया देखील डोक्यावर पदर, घुंगट घेतांना तसेच हॅट्स व विविध प्रकारच्या टोप्या/वस्तू वापरतांना आढळतांना दिसतात. सैन्य व पोलिस दलात तर टोप्या गणवेषाचा अविभाज्य भाग असतो. समारे ७०८० वर्षापूर्वी पागोटे घालण्याच्या प्रकारानुसार व्यक्ती कोणत्या समाजाचा आहे ते कळायचे. वारकयांची ओळख तर त्यांच्या टोपीमुळेच होते. स्वातंत्र्य लढ्यात तर गांधी टोपीचे योगदान फार मोठे. संघाची काळी टोपी, सावरकरांची गोल उभी काळी टोपी,आर.पी.आय.ची निळी टोपी आणि किसान आंदोलनाची हिरवी टोपी यामुळे डोक्यामधील विचारधारा डोक्यावरच्या टोपीमुळे सहज लक्षात येते. लग्न समारंभात आता फेटा बांधणे अगत्याचे झाले आहे. पगडी, पागोटे यांचा संबंध प्रतिष्ठा व आत्मसन्मानशीही जोडला जातो. पागोटे दुसर्‍या व्यक्तीच्या पायावर ठेवणे म्हणजे आत्मसन्मान त्या व्यक्तीच्या चरणी ठेवणे असे समजले जाते. पगडी उछालना या हिंदी म्हणीचा अर्थ आत्मसन्मानाचा भंग करणे असा होतो. कुणाच्या मृत्यूची बातमी कळताच डोक्यावरची टोपी काढून मृत व्यक्तीच्याप्रती सन्मान प्रगट केल्या जातो. युध्दात डोक्याला ईजा होऊ म्हणून शिरस्त्राण वापरले जाते. तर स्वयंचलित दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर सक्तीचा आहे. राजस्थानी, गुजराथी व अन्य राज्यातील पगड्या त्या त्या राज्याचे वैशिष्ट्य असतात. राजे, प्रधान मंत्री, मंत्री, सेनापती यांच्या पगड्या त्यांच्या मानाप्रमाणे असत. प्रत्येक राजाची पगडी विशेष असायची. पुण्यप्रतापी छ. शिवाजी महाराज व हिंदूह्रदयसम्राट छ. संभाजी महाराज हे जिरेटोप घालत. हे दोन्ही राजे हिंदुधर्म भूषण. सभोती संकटे वाढून ठेवलेली. गनिम केंव्हा घाला घालतील याचा नेम नाही. अष्टौप्रहर जागृत असणे व युध्दसज्ज असणे गरजेचे. त्यामुळे शिर संरक्षित असणेही महत्वाचे. पण कसे, तर इतरांच्या लक्षात येऊ न देता. यामुळे त्यांचा मुकूटही विशेष प्रकारचा. त्याचे सुप्रसिध्द नांव जिरेटोप. जिरे हा शब्द मुळचा झिरीह असा असून तो फारसी आहे. त्याचा अर्थ साखळीचे चिलखत असा होतो. या मुकूटाच्या अंतर्भागात बारिक नक्षीदार लोख॔डी कड्या जरीच्या धाग्यांनी मढवलेल्या असतात. अर्थात इतर राजे परिधान करत असलेल्या मुकूटापेक्षा हा मुकूट थोडा जड असतो. तर असा असतो जिरेटोप. या जिरे चा सैंपाकातील जिरे शी काहीही संबंध नाही, बरे का.     किरण देशपांडे२७०८२०२१

 • शुभकार्याचा मुहूर्त
  5 min 29 sec

  शुभकार्याचा मुहूर्तगणपतराव देसमाने हे काळगे गावचे रहिवासी. व्यवसाय पुर्ण वेळ शेती. एक १८ एकरचे शेत गावाजवळ व दुसरे २२ एकरचे शेत गावापासून सुमारे ८९  किलोमीटरवर. घरात बायको, एक मुलगी व एक मुलगा. मुलगी व मुलगा दोघेही गावच्या शाळेत शिकतात. शेतासाठी दोन खिल्लारी बैलजोड्या  शेतातल्या गोठ्यात बांधलेल्या. काही शेळ्या व एक कोंबड्यांचे खुराड घराच्या अंगणात. गणपतराव शेतात निरनिराळे प्रयोग करायचे. त्यांची शेतं नहराच्या सिंचनाखाली आली होती. पाण्याची विपुलता होती. त्यामुळे शेतीतील काही भाग त्यांनी बागायती म्हणून ठेवला होता. शेतात भरपूर चारा असल्याने त्यांनी दूधदुपत्यासाठी दोन गायी घेतल्या होत्या. त्याही त्यांनी शेतातील गोठ्यातच बांधल्या होत्या. त्यांच्या बायकोला गायी घरच्या गोठ्यात हव्या होत्या. पण हिवाळा असल्याने गणपतरावाचे मत असे होते की, चारापाणी शेतात बक्कळ असल्याने गायींसाठी गोठा अंगणात हिवाळा संपतेवेळी बांधू. हिवाळा संपायला आला. शेतातली पिके घरात आली. भुसकुतलेले धान्य जरी मशिनीवर साफ केले असले तरी धान्याबरोबर खडे, थोडाबहुत काडीकचरा, भुसा असतोच. कणगीत ते निवडून पाखडून व कडूलिंबाच्या पानाचे थर लावून भरावे लागते. अशाने धान्याची वज चांगली राहते. हिवाळा संपल्या संपल्या गावाची जत्रा भरते. औंदा गणपतरावांचा आतेभाऊ शहरातून यात्रेसाठी बायको, पोराबाळासहीत आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. पण गणपतरावाच्या बायकोला शेतातून दूध येईपर्यंत ताटकळत बसावे लागे. चहा घेतल्याखेरीज पोटाचा झाडा होत नसल्याने पाहुणे बेचैन असत. शेवटी गणपतरावांची बायको वैतागली. पाहूण्यांच्या देखत तिने विषय काढला. अवो, गाईचा गोठा तयार कराचा नव्हं. कवा कराचा म्हंतो मी. गणपतराव म्हणाले, अवो, आता लई काम नाय वावरात. पाखाळणीला गायी बांधू घरच्या गोठ्यात. खेड्यातली भाषा पाहूण्यांच्या डोक्यावरून गेली. त्याने न राहवून गणपतरावाला विचारले भाऊ, पाखाळणी म्हंजे काय रे गणपतराव म्हणाले, अरे, जत्रेत देवाची आंगोळ होते ते म्हंजे  पाखाळणी. विषय तरीही स्पष्ट होत नाही, होय ना यापूर्वी या लेखात पाखडणे हा शब्द आलेला आहे. भुसं भरलेल्या धान्याला स्वच्छ करण्यासाठी ते पाखडावे लागते. स्वच्छ करण्याच्या कृतीचा पाखाळणी या शब्दाशी असा घनिष्ट संबंध आहे. संस्कृत शब्द प्रकर्षाने यावरून हा शब्द आला असण्याची शक्यता बरीच आहे. देवाची आंघोळ म्हणजे देवाला पाण्याने स्वच्छ करणे. पाखाळणी म्हणजे स्वच्छ करणे. देवाच्या पाखाळणीच्या मुहूर्तानंतर चांगल्या गोष्टींचा शुभारंभ केल्यास त्या बिनाविघ्न तडीला जातात हा जुना समज असावा. पाखाळणी  हा शब्द नेहमीच्या पाखडणे या शब्दाच्या जवळ असुनही त्याचा अर्थ पटकन उलघडत नाही हीच तर या शब्दाची खासियत आहे. तसा याचा दुसरा अर्थ शेतीच्या हंगामानंतर कास्तकारांची कृषी वल्लभांची पार्टी अथवा जेवणावळ. हा शब्द नक्की वापरा व रूढ करण्यास मदत करा ही विनंती.किरण देशपांडेनेरूळ, दि.१०\०२\२०२२9969871583

 • डबघाई = डफघाई
  5 min 41 sec

  किरण देशपांडेनेरूळ, दि. ०७\०२\२०२२9969871583.

 • व्यासपीठ
  4 min 25 sec

  व्यासपीठफार पुरातन काळापासून मानवी जीवनाचा प्रवास धार्मिकतेच्या नौकेतून चाललेला आहे. संपूर्ण जीवनच त्यावेळी धार्मिकतेने व्यापलेले होते, आताही बयाच प्रमाणात ते व्यापलेले आहे हे सर्वांनाच दिसते. धार्मिक पुराणिक कथा सांगणे, धार्मिक पुराणिक विषयावर नाटके करणे, धार्मिक पुराणिक विषयावर काव्य करणे हे त्यावेळी सहजतेने घडे व त्यातच समाजाला रुची असे. त्यातल्या त्यात सोयीचा व जनरुचीचा प्रकार कथा सांगणे हा होता. कुठेल्यातरी देवळात अशा कथा सांगणारे पुराणिक येत. त्याची माहिती लोकांना हस्तेपरहस्ते कळे. मग संध्याकाळी त्यांचा कीर्तनाचे कार्यक्रम ठरलेलाच असायचा. या कीर्तनासाठी नंतर कुठल्याही जाहिरातीची आवश्यकता नसायची कि आमंत्रणही आवश्यकता नसायची. पुराणिकबुवांसाठी एक तक्तपोस देवळात ठेवलेला असायचा. कीर्तन सुरू होण्यापूर्वी देवाची पुजा केली जायची मग पुराणिकाचाही हार घालून सत्कार केला जायचा. मगच कीर्तनाला सुरुवात केली जायची. श्रोत्यांचे ३४ तास मग आनंदात जात. मनोरंजनाबरोबर ज्ञानाचीही लयलूट या कार्यक्रम होत असे.कालांतराने गर्दी वाढायला लागली. देवळातली जागा अपुरी पडायला लागली. टाळकरी, पेटीवाला, तब्बलजी, पुरोहित यांचेसाठी गर्दीमुळे जागा उरेनाशी झाली. त्यासाठी मंदिराबाहेर मंडप उभारण्यात येऊन पुराणिकांसाठी ३ ते ४ फुट उंचीचा तात्पुरता तक्तपोस तयार करण्यात यायचा. हा तक्तपोस श्रोतावर्गापासून थोडा दूर असायचा. संस्कृतमध्ये व्यासः म्हणजे वेगळी केलेली जागा तर पीठं म्हणजे पुरोहिताची बसण्याची जागा. यामुळे पुर्वी देवळातील कीर्तनाच्या वेळी पुराणिक बसण्याच्या तक्तपोसाला व्यासपीठ म्हटल्या जात. आताही अशा उभारलेल्या कायम स्वरूपी अथवा तात्पुरत्या स्वरुपात उभारलेल्या तक्तपोसाला व्यासपीठच संबोधण्यात येते. पण आता या व्यासपीठाचा वापर विविध कारणांसाठी करण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे आता व्यासपीठाची व्याख्या सर्वसाधारणपणे विचार मांडण्याची किंवा कलाकृती सादर करण्याची एक निश्चित जागा अशी केली जाऊ शकते.व्यासपीठ या शब्दाची व्युत्त्पति मुळ संस्कृत शब्दापासून झालेली आढळते. त्यावेळी त्या शब्दाचा अर्थ वेगळा होता आणि आता बदलत्या वापरामुळे त्याच्या अर्थाची वाढलेली व्याप्ती यामुळे त्याचे बदललेले स्वरूप लक्षवेधक नक्कीच आहे.

 • कलगीतुरा
  6 min 22 sec

  सरदार निंबाळकर सकाळी शिबंदीची पाहणी करण्यास निघाले. आज त्यांनी पागोट्यावर लावलेला शिरपेच सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. शिरपेचात लावलेला हिरा कोवळ्या सूर्यप्रकाशात लखलखत होता. त्याचेवर लावलेली सोन्याची कलगीचे प्रत्येक लहान लहान गोळे त्याच्या चालीमुळे हिंदकळत होते. त्यावरून परावर्तीत होणाऱ्या  प्रकाशकिरणांचा लपंडावाचा खेळ मनोवेधक होता व पाहणार्‍यांची प्रसन्नता वाढवीत होता. शिबंदीची तपासणी करून सरदार निंबाळकर परत गेले तरी त्यांच्या या हलगीची चर्चा सुरूच होती. हलगी साधारणपणे तुळशीच्या मंजिरीसारखी दिसते. सरदार गायकवाड यांनी दसर्‍याचा सण आनंदाने साजरा केला. संध्याकाळी शस्रपूजनासाठी त्यांनी पेहराव चढविला. सफेद र॔गाचा रेशमी अंगरखा त्यांनी परिधान केला होता. तशाच रंगाची अचकनही घातली होती. त्यांनी केसरी रंगाचे पागोटे घातले होते. त्यावरील शिरपेचात पिवळ्या रंगाचा तुरा लावला होता. वार्‍याच्या तालावर तो भुरभुरत होता. त्यामुळे सर्वाचे लक्ष तुयाकडे जात होते. असे तुरे आपणही बर्‍याच ठिकाणी पाहिले असावेत. आताही नवरदेवाच्या फेट्यावर कधी कधी असा तुरा लावलेला  आढळू शकतो. कलगी तुरा हे शब्द पगडी, फेटा वा पागोट्यावरिल शिरपेचात शोभा वाढविण्यासाठी लावायचे एक शिरोभुषण वस्तू आहे, हे येव्हांना आपल्या लक्षात आले असेलच. एका गावात सवाल जबाबाचा कार्यक्रम होता. पण हा कार्यक्रम धार्मिक होता. त्यामुळे श्रध्दावंतांची या कार्यक्रमाला खूप गर्दी केली. हिंदू समाजात शक्तीचे प्रतिक देवी स्वरूप मानले जाते. तर प्रकृती म्हणजे शीवाचे स्वरूप मानले जाते. त्यांच्या या गुह्य  स्वरूपाचे वर्णन सवालात कवनातून केले जाते, त्याला कवनातूनच जबाब देण्यात येते. धार्मिक स्वभावाचे प्रतिभासंपन्न कलाकार यात भाग घेतात. सवाल जबाब ऐकतांना भक्त रंगून जातात. शक्ती व प्रकृतीचे विविध स्वरूपाची गुह्य व कोणती दुसया देवतेपेक्षा किती सामर्थ्यवान याची वर्णने त्यात असत. यातून या भक्तजनांचा एकमेकांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न असायचा.  आता हा प्रकार फारसा अस्तित्वात नाही. वास्तविक हे दोन संप्रदायांचे लोक असत. शक्ती संप्रदायाच्या भक्तांना नागेश तर प्रकृती शीव संप्रदायाच्या भक्तांना हरदास संबोधतात. शक्ती नागेश पंथीयांना कलगी पंथीय तर शीव हरदास पंथीयांना तुरेवाले पंथीय म्हटल्या जायचे. सवाल जबाबात या दोन संप्रदायातील श्रध्दावंत कलावंतात चढाओढ लागलेली असायची, ती केवळ आपल्या संप्रदायाचे श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी.या शब्दांची ही पण एक अध्यामिक पार्श्र्वभूमी आहे.तमाशाचा फड हा प्रकार तर सर्व परिचित आहे. हा लोकनृत्याचा प्रकार आहे. यातील शृंगारिक लावण्या तर गावातील लोकांचा अत्यंत आवडीचा विषय.  यांत दोन लावण्यवती कलावंतीणीमध्ये आपआपसात सवाल जबाब होत. एकीने दुसरीला कोडे घालायचे. त्याला दुसरीने जबाब देऊन कोडे सोडवायचे. नंतर तीने पहिलीला सवाल विचारचा व त्याला पहिलीने जबाब द्यायचा. मात्र हे सर्व करायचे ते गाण्यातून व नृत्यामधून. ही गाणी शृंगारिक स्वरूपातील असायची त्यामुळे अशा फडांना तुफान गर्दी व्हायची. या सवाल जबाबात एकमेकांवर जेते पद मिळविण्याचा प्रयत्न केला जायचा. त्यासाठी आटापिटा केला जायचा. एकमेकावर मात करण्याचा उदिष्ट त्यांत असायचे. आपल्या लावणी पार्टीचा लौकिक वाढावा हा त्यामागचा उद्देश असायचा. मला वाटते सध्या याच अर्थाने हा शब्द जास्त प्रचलित आहे.मूळ तुर्की असलेला हा शब्द आहे.  कलगी म्हणजे पागोटे व तुरा म्हणजे त्यावर लावलेले फूले, मोती वा इतर आभुषणे. आपल्याकडे हा शब्द फारसी भाषेतून आला. शब्दांची व्युपत्ती व नंतरचे त्या शब्दांचा कालोघात बदलेला अर्थ यांचा प्रवास फार मनोरंजक असतो नाही का

 • आधण
  4 min 3 sec

  आधणअग, मला आज ऑफिसमध्ये लवकर जायचे आहे. आंघोळीसाठी आधण ठेवतेस काय सुमारे तीसेक वर्षापुर्वी बहुतांश घरातून केंव्हाना केंव्हा अशी साद दिल्याचे ऐकू यायची. किंवा अहो, चहासाठी आधण ठेवले आहे. या लवकर. अशी हाकोटी तर नेहमीच ऐकायला मिळायची. आताशा आधण हा शब्द कमी ऐकायला येतो. परवा मात्र हा शब्द ऐकला आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पुर्वी हा शब्द कसा वारंवार ऐकायला मिळायचा. त्यामुळे असेल की काय, या शब्दाच्या नेमक्या अर्थाचा फारसा विचार कुणी करीत नसावे. आताही असे बरेच शब्द आहेत की, ज्यांचा आपण फारसा विचार करीत नाही. बोलतांना कितीतरी शब्द आपण सहज बोलतो, पण त्यांचा नेमका अर्थ आपल्याला माहित नसतो. कुणी तसा तो सांगितला तर त्या शब्दाच्या उत्पत्तीचे आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. तर परवा आधण शब्द ऐकला आणि त्या शब्दाचा नेमका अर्थ काय असावा याचा विचार सहज मनात डोकावला. मला बरेच दिवसांपासून शब्दांचे नेमके अर्थ शोधण्याची खोड लागली आहे.आता खोड या शब्दाचाही नेमका अर्थ शोधावा लागेल. मराठीमध्ये संस्कृत, हिंदी, कानडी, मल्याळम्, फारसी, अरबी, अन्य बोलीभाषा अशा अनेक भाषांमधून शब्द आले आहेत. बरेचदा मुळ भाषेतील शब्दाच्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ आपण मराठीत वापरतो. कांही वेळा त्याचे अपभ्रंशीत उच्चारण आपण करतो. काहीही असो त्यामुळे भाषा मात्र समृध्द होत जाते यांस प्रत्यावाद नसावा. अरे हो, पण तुम्ही म्हणत असाल की, त्या आधण शब्दाचं पुढे काय झाले तर आधण हा शब्द आला आहे हिंदीतून. दहन या शब्दापासून. अदहन म्हणजे ज्याचे दहन होत नाही. पाण्याचे आधण ठेवतात. पाणी अदहन आहे. त्याची वाफ होते पण ते नष्ट होत नाही. तर अशाप्रकारे आधण हा शब्द मराठीत वापरात आला. आता मला प्रश्न पडला आहे की, दहन शब्द आला कुठून कृपया कुणी तरी सांगाल काय.किरण देशपांडे०३/०८/२०२१संकल्पना आणि आवाज   पौर्णिमा देशपांडे प्रस्तुती मी Podcaster 

 • कज्जा कचेरी
  10 min 16 sec

  कज्जा कचेरीएक वाचलेली गोष्ट आठवली. गोष्ट काका व पुतण्याची आहे. दोन भाऊ खेड्यातले. मोठा हुषार. शिक्षणाची आवड. शिकून मोठा अधिकारी होतो. शहरात नोकरी करतो. स्वतःचे घर बांधतो. लग्न करतो. योग्यवेळी सेवानिवृत्त होतो. त्याला एक मुलगा असतो. तो आता तरूण झालेला असतो. लहानपणापासून अधेमधे आईवडिलांबरोबर खेड्यात जात असतो. त्याचा काका त्याच्या वडिलांपेक्षा बराच लहान असतो. काकाचे शिक्षणात लक्ष नसते. वडील मात्र काकाने शिकावे म्हणून फार प्रयत्न करतात. पण काका शिक्षणापेक्षा शेतीत रमतो. वडिल शेतीसाठी होणारा खर्च त्याला पुरवीत असतात. म्हातारपणामुळे आईवडिलांचे निधन होते. मग मोठा भाऊच लहान भावाला पैसा पुरवीत असतो. त्याचे लग्नही करून देतो. लग्नानंतरही मोठा भाऊ लहान भावास पैसा पुरवीत असतो. हे सर्व मोठ्या भावाचा मुलगा पाहत असतो. ऐके दिवशी तो वडिलांना म्हणतो की, आता काकाला पैसे पाठविणे बंद करा. त्याचे वडिल कांही त्याचे ऐकत नाही. मग त्या दोघांमध्ये वादविवादाला सुरूवात होते. शेवटी कंटाळून वडिल त्याला वडिलोपार्जीत मिळकतीचे वाटण्यासंदर्भातील मुखत्यार पत्र देतात व मुलाला पाहिजे ते करण्याची मोकळीक देतात. मग हा मुलगा, काकांना वडिलोपार्जीत मिळकतीची वाटणी मागतो. पण काका त्याला स्पष्टपणे नकार देतो. मग मात्र पुतण्या काकांविरूद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी करतो. पुतण्याला शेतीची, घराची वाटणी करण्यासाठी मोजमाप घेणे, वेगवेगळे कागदपत्र जमा करण्यासाठी खेड्यात वारंवार जावे लागायचे. पहिल्यांदा तो जेंव्हा  खेड्यात जातो, त्यावेळी गावात कुठे राहायचे हा प्रश्न त्याच्यासमोर येतो. पण तो गावात आल्याचे कळताच त्याचा काका स्वतः त्याला घरी घेऊन जातो. तो काकाच्या घरी पोहचल्याबरोबर त्याच्या लहानग्या चुलत भावंडानी त्याला आनंदाने मिठ्या मारल्या. मोठ्या भावाच्या आगमनाचा त्यांना खूप आनंद झाला होता. ते त्याला सोडायला तयार नव्हते. शेवटी काकूने जेवायला बोलावल्यावर त्याची सुटका झाली. मोजमापाच्या कामात त्याला काकाने सर्व मदत केली. तलाठी कार्यालय, नायब तहसीलदार कार्यालय, भूलेख कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जेथे जेथे त्याला जावे लागे किंवा काम असे तेथे तेथे काका त्याला सोबत करी व मदतही करी. एखाद्या वेळी एकाच कार्यालयात कामासाठी त्याला तीनतीन चारचार वेळा जावे लागे. या कामासाठी खूप वेळ जायचा. कचेरीच्या कामापायी तो वैतागून गेला. त्याच्या लक्षात आले की, खेड्यात राहून कचेरीतील कामे करवून घेणे केवढे अवघड असते. ऐके वेळी त्याने या कामाचा नाद सोडायचा विचारही केला. पण काका त्याला म्हणाला तु कोणती कागदपत्रे पाहिजेत ते सांग. मी घेऊन येत जाईन. पण हाती घेतलेले काम कांही सोडू नकोस. आता कार्यालय हा शब्द चांगलाच रूळलेला आहे. मात्र पूर्वीच्या पिढ्यात त्याऐवजी कचेरी हा शब्द चांगलाच रूढ होता. तो आता लुप्त होत आहे. कचेरी म्हणजे सरकारी कामाचे ठिकाण. हा शब्द मुळचा फारसी आहे. संस्कृतमध्ये त्याला कृत्यगृही, पालीमध्ये किच्चम, प्राकृतात कच्च, बंगालीत काचारी, गुजराथीत कचरी वा कचेरी म्हणतात. गुजराथीत कचेरी या शब्दाचा अर्थ व्यापाऱ्यांची पेढी असेही होतो. तेलगुमध्ये कचेरीला कचेली असे संबोधतात. सर्वसामान्यांना मात्र कचेरीत जाणे म्हणजे तेथील वातावरण व कर्मचाऱ्यांची वागणूक यामुळे अंगावर काटा येणारी गोष्ट असते. कार्यालय या शब्दापूर्वीचा शब्द म्हणजे कचेरी, या शब्दाची व्युत्पत्ति तर आपण समजावून घेतली आहे. आता वळू या पुढील गोष्टीकडे... बराच आटापिटा करुन पुतण्याने खटल्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे काकांच्या मदतीने जमविली. पण काकांचा, काकूंचा स्वभाव व त्यांच्या मुलांचा लागलेला लळा, यामुळे त्याला त्यांच्यावर खटला दाखल करण्याची इच्छा होईना. त्याने याबाबत वडिलांना विचारले. वडिल म्हणाले जे तुझ्या मनात येईल तसे कर. त्याने काकाला विचारले, तो म्हणाला, अरे, एवढे श्रम केले आहेस, आता मागे हटायला नको. शेवटी पुतण्याने काकावर खटला दाखल केला. न्यायालय खेड्यापासून दहा बारा किलोमीटरवर होते. येथे जाण्यासाठी रस्त्यात येणारी नदी नावेत बसून ओलांडावी लागे. पुतण्या खटल्याच्या तारखेआधी एक दिवस अगोदर काकाच्या घरी हजर होई. सकाळी काकू, काका व पुतण्याला जेवण वाढे. त्यानंतर दुपारचे जेवण दोघांसाठी वेगवेगळे देई. काका पुतण्या नावेपर्यंत एकत्र असत. नावेत मात्र काका एका टोकाला तर पुतण्या दुसर्‍या टोकाला असे. खटल्यात काका पुतण्यावर ना ना तहेचे कठोर आरोप करी. काकाने खटल्यात पुतण्याला सळो की पळो करून सोडले. दुपारी ते दोघे आपले जेवण वेगवेगळे बसून खात. काकाचा न्यायालयात पुतण्याशी व्यवहार वैयासारखा असे. खटल्यावरून येतांनाही ते वेगवेगळे येत. नावेतही विरूध्द टोकाला बसत. मात्र एकदा नावेतून उतरल्यावर ते घरी एकत्रच जात. त्यानंतर खटल्याच्या पुढल्या तारखेपर्यंत काका पुतण्या अगदी मित्राप्रमाणे वागत. बयाच तारखा पडल्यावर शेवटी एकदाचा निकालाचा दिवस आला. निकाल पुतण्याच्या बाजूने लागला. घरी आल्यानंतर काका त्याच्या मुलांना म्हणाला, चला, घर रिकामे करा. कज्जा तुमच्या भावाच्या बाजूने लागला आहे. आता ते तुमच्या भावाचे घर आहे. काका, काकू व मुले घरातून सामान बाहेर काढू लागले. हे बघून पुतण्याचे मन हेलावून गेले. तो रडायला लागला. सर्व सामान बाहेर आल्यावर काका व काकू समानाशेजारी बसले. काही वेळ गेल्यानंतर काकाने मुलांना मोठ्याने सांगितले, चला, मुलांनो आता आपण तुमच्या भावाच्या घरात राहायला जावू. चला सामान घरात न्या. हे ऐकून पुतण्या गदगदला. काकाच्या मिठीत जाऊन रडू लागला. त्याला आता काकांकडून पिढीजात मिळकतीचा वाटा नको होता. त्याने खेड्यातले कष्टदायक जीवन या खटल्याच्या निमित्ताने पाहिले होते. काका व त्याच्या कुटुंबाचा नात्यातील ओलावा अनुभवला होता. गोष्टीच्या या भागात आपण खटला शब्द वारंवार वापरलेला आहे व एका ठिकाणी कज्जा शब्द वापरलेला आहे. पुर्वी खटला या शब्दाऐवजी कज्जा शब्दच वापरला जायचा. आता हा शब्द लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. कज्जा म्हणजे खटला, भांडण, लढाई. अरबी शब्द कझिया याचा अर्थ गोष्ट किंवा प्रतिज्ञा तर फारसी मध्ये कझिया म्हणजे भांडण. म्हणजे हा शब्द फारसी शब्दाच्या जवळचा जरी असला तरी त्याचे एक मुळ अरबी शब्दाकडे जाते. कारण हा एकच शब्द दोन्ही भाषेत वेगवेगळ्या अर्थानी येतो. या शब्दाच्या छटा म्हणजे कज्जाग, कज्जेदलाल, कज्जेखोर, आणि प्राकृतात कज्जासण. अशी या शब्दाची व्युत्पत्ति आहे. कचेरीतील कामे असो कि, कज्जा चालवणे असो दोन्ही कामे बहुदा वेळखाऊ व त्रासदायक असतात हे मात्र खरे आहे. म्हणून सहसा त्याच्या वाटेला न जाणेच इष्ट ठरते.किरण देशपांडेनेरूळ नवी मुंबर्ई.९९६९८७१५८३०२/०५/२०२२

 • विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्य
  7 min 6 sec

  विदुषी दुर्गा भागवतांचे शब्द लालित्यकवी मंगेश पाडगावकरांच्या जिप्सी या काव्यसंग्रहाचे परिक्षण करतांना विदुषी दुर्गा भागवतांनी शब्दालंकार लेवऊन भाषेला कशी नटविली, सौंदर्यावती कशी बनविली याची झलक खाली देत आहे.फक्त ती काळी अक्षरे होती आणि ती वाचणारी मी होते. काही अक्षरे पंक्तीपंक्तीनी सजीव व सशब्द झाली होती. काही कुंचल्याचा आकार धारण करून रंगीत चित्रे रेखाटीत होती. काही हिरव्या, केशरी व निळ्या रंगाचे फवारे सोडीत बसली होती. काहींची काया नाहीशी होऊन मातीच्या अत्तराचा ती भपकारा वर फेकीत होती. काही तेजस्वी ठिपके होऊन आकाशात उगीचच भिरभिरत होती. काही खूप खूप मोठी होऊन नदीप्रमाणे वहात होती. ढगाप्रमाणे गर्जत होती. आणि काही हट्टी पोरांप्रमाणे फुरंगटून कोपर्‍यात बसली होती.ही झाली अक्षरांची विदुषी दुर्गा भागवतांनी यांनी रचलेली बाललीला. आता पुढे अक्षरांची शब्दफुले होऊन त्यांनी अर्थवाही, भाववाही स्वरूप धारण केल्यावर ॠचा रूपात अवतरलेल्या कवितेच्या अनुषंगाने त्या लिहितात :सर्वांना गती देणारे संगीतही कुठून तरी ऐकू येत होते. परिचित, मृदू, मंजुळ असे. आणि मग त्या संगीताचे काय ते भान उरले. आणि मग थोडा अलिप्तपणा पत्करून मी त्या नादप्रतीतीचे पृथक्करण करू लागले. कवितेच्या पारंपरिक गेयतेपासून पाडगावकर कटाक्षाने दूर राहत असले तरीही पारंपरिक आणि नविन छंदांनी ही कविता निनादित आली आहे. ताल व नादाचे गतीमान व पार्थिवतेतून पुलकित झालेले सुकुमार सौंदर्य त्यांच्या शब्दाशब्दाने आत्मसात केले आहे. शब्दांनीच नव्हे तर अर्थानेही मूर्त अमूर्त अशा भाववृतींनीही. या कलात्मक सुसंवादामुळेच जी निसर्गप्रतीके पाडगावकरांनी वापरली आहेत, ती केवळ रंगानी भरलेली शब्दचित्रे वाटत नाहीत. ती गेयतेनी रसरसलेली नादबिंबे आहेत. ती गेयता झुळझळणाया पाण्यात, भरकटणाया वायात, रातकिड्यांनी नादविलेल्या रात्रीच्या काळोखात, पक्ष्यांच्या बोलात, फुलपाखराच्या विभ्रमात आणि अनंत सौंदर्यप्रतिमानात रात्रंदिवस विश्वगतीचे रूप घेऊन धावत असते अचेतन सचेतन करते, सचेतन भावान्वित करते. तीच ही विशाल निरींद्रिय गेयता पाडगावकरांनी आपल्या काव्यात भरभरून ओतली आहे. बासरी वाजवणारा आपला श्वास बासरीत ओततो तशी. केवळ गतीचाच नाद व लय नव्हे, तर रंगाच्या सौंदर्यातला, प्रकाश छायेतला, वरवर पाहणारांना निःशब्द वाटणारा, पण कलावंताला जाणवणारा प्राणभूत सूक्ष्मतर नादही त्यांनी या गेयतेत कलाबूतासारखा पेरला आहे. त्यामुळे  पारंपरिक व अपारंपरिक अशा दोन्ही अभिरूचींना रिझवू शकेल अशी घडण त्यांच्या कवितेला लाभली आहे. पाडगावकरांच्या कवितेचा गाणे हा स्थायीभाव आहे. त्यांच्या कवितेच्या लोकप्रियतेचे सर्वात मोठे कारण हे आहे.संथ निळे हे पाणीवर शुक्राचा तारा कुरळ्या लहरींमधुनी शीळ घालतो वारा या ओळीतील विलंबित तालाशी पहा नाहीतर अफाटआकाश                  हिरवी धरतीपुनवेची रात   सागरभरती पाचूंची लकेर   कुरणाच्या ओठी प्रकाशाचा गर्भ       जलवंती पोटी अखंड नूतन मला ही धरित्री आनंदयात्री मी आनंदयात्री यातली द्रुतगती पहा, ते नादसौष्ठव पहा. हा गतीचा ध्यास, नादाताला ध्यास पाडगावकरांना निसर्गाचेदर्शन झाले आहे, जी निसर्गाची सृजनप्रेरणा त्याच्या नसानसातून वाहतांना त्यांना भासते आहे तिच्या कलापुर्ण जाणिवेतून उत्पन्न झाली आहे.जितके सुंदर काव्य, त्याची मनोवेधकता, तरलपणा, निसर्गसानिध्यता, निवडक अक्षरशब्दांची पाखरण, नादलयतालगतीवैविधतासहजता तितकेच रुचीपूर्ण, शब्दलालित्य असलेलेली, काव्याचे मर्म उलगडणारी, मनोवेधक, मनोभावी, सहज व सुंदर काव्य समीक्षा विदुषी दुर्गा भागवत यांनी केलेली आहे. अशी विदुषी महाराष्ट्रात निपजली व साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात तळपली ही तमाम मराठीप्रेमींसाठी गौरवास्पद बाब आहे.किरण देशपांडे. नेरूळ, नवी मुंबई. दिनांक २७\०१\२०२२. मोबाईल 9969871583.

 • विसण घालणे
  6 min 59 sec

  विसण घालणेदाट अंधार सभोवताली आहे. दात वाजविणारी थ॔डी पडलेली आहे. घरातील सर्वजण, उबदार दुलईत गुुरफटून गाढ झोपलेले आहेत. इतक्यात आजीची हाळी ऐकू येते. अरे ऊठा, मंगल, वैशाली ऊठ. दिवाळीच्या दिवशी तरी लवकर ऊठा. दिवाळीत घरोघरी विशेषतः नरकचतुर्थीच्या सकाळी हे हमखास घडते. मग कांही मंडळी आपण होऊन उठतात, तर कांहीना हलवून हलवून जागे करावे लागते. मुखमार्जनानंतर मग, ओवाळणे, मसाज करून सुगंधी तेल अंगात जिरवणे व घरी पाटा वरवंट्यावर  वाटलेल्या अथवा खलबत्त्यात कूटलेल्या व भिजलेल्या उटण्याने अंगावरील मळ साफ करण्याचा कार्यक्रम होतो.  जरा आठवून पहा, आपल्याही घरी थोड्याफार फरकाने हेच घडत असणार याची मला खात्री आहे. यानंतर येतो अभ्यंगस्नानाचा कार्यक्रम. कुडकुडत्या थंडीत कडकडीत तापलेले पाणी घंगाळात ओतल्या जाते. तितक्यात आजी किंवा आई  यातील कुणाचा तरी आवाज येतो. अरे थांब पाण्यात विसण घालून देते आता आली का पंचाईत. विसण घालणे म्हणजे काय झाली ना दांडी गूल. अहो, मी जो शब्द वापलाय, त्याचा काळ आजचा नाही. सुमारे पन्नास साठ वर्षाच्याही अगोदरचा आहे. त्यावेळचा, ज्यावेळी हिवाळ्यात थ॔डी पडायची. उन्हाळ्यात ऊन तापायचे. आणि पावसाळ्यात पाऊस पडायचा. ज्यावेळी शहरे सीमित होती व जास्तीत जास्त जनजीवन लहान गावांत विखुरले होते. ज्यावेळी पाटावरवंटा, खलबत्ता वापरला जायचा. ज्यावेळी चुलीवर स्वयंपाक केला जायचा व पाणी तापविले जायचे. विसण घालणे हा शब्द त्या काळचा आहे.  पाणी खूप गरम असेल तर अंगावर पाणी घेण्यासारखे  करण्यासाठी थंड पाणी त्यात मिसळण्याच्या कृतीस, विसण घालणे असे म्हणायचे. अंघोळीसाठी जवळच्या थंड पाण्याच्या हंड्यातून गडवा किंवा लोटीने पाणी घेऊन गरम पाण्यात मिसळत व सुमंगल अभ्यंगस्नानाचा आनंद घेत.  विसण घालणे हा शब्द आता परिस्थितीनुसार कालबाह्य झालेला आहे. शहरात वीज आली. वीजेवर चालणारी उपकरणे आलीत. घराघरात नळ आले. पाणी गरम करणारे गीझर आले. ठंड गरम पाणी योग्य प्रमाणात एकत्र करण्यासाठी मिक्सर आला. परिणामी हा शब्द शहर संस्कृतीतून हद्दपार झाला. ग्रामीण भागात वीज आल्यानंतर शहरी संस्कृतीच्या प्रभावाखालील ग्रामीण बोलीभाषेतूनही हा शब्द आपोआप वगळल्या गेला असावा. असे अनेक शब्द आहेत, जे आता वापरात नाहीत. असेही अनेक शब्द आहेत की, जे आता विस्मृतीच्या उंबरठ्यावर आहेत. तर काही शब्द, बोजडतेमुळे अथवा पर्यायी सोपा शब्द मिळाल्यामुळे वापरात नाहीत. काही शब्द बदलेल्या परिस्थितीमुळे वापरात राहिले नाही. असे असले तरी जुने विस्मृतीत गेलेले शब्द, तत्कालीन समाजाच्या जीवन पध्दतीचे आकलन करून देत असल्याने, एक सांस्कृतिक  ठेवा असतो. या शब्दांना जपणे आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते, असे मला वाटते. येथे चुल, पाटावरवंटा, खलबत्ता, घंगाळ, हंडा, गडवा व लोटी हे शब्द वस्तुंच्या स्वरूपाबाबत आहेत. त्यांची जपवणूक सहज होऊ शकते. पण विसण घालणे व कुटणे हे शब्द कृती दर्शवणारे आहेत. विसण घालणे या शब्दाबरोबर चुल, त्यांतील जळण म्हणून वापरले जायचे सरपण लाकडे या जुन्या वस्तु अप्रत्यक्षपणे जोडलेल्या आहेत. कुटणे हा शब्ददेखिल कार्यवाही शब्द आहे. असे शब्द व अनेक जुने अर्थवाही शब्द जाणीवपुर्वक जोपासण्याची गरज आहे.किरण देशपांडेनेरूळ, दि. ०७\०२\२०२२9969871583.

 • गप्पा पुनवेच्या
  6 min 22 sec

  मराठी भाषचं भविष्य वैगरे अश्या मोठं मोठ्या विषयांवर आपण भाष्य करणार नाही आहे, पण रोजच्या बोली भाषेत सोप्या शब्दांसाठीही आजकाल इंग्रजी शब्द वापरले जातात, त्याचा काय परिणाम होतो ह्याचं एक उदाहरण पाहूया. आता पहा लाल भोपळा किंव्हा ज्याला आमच्या विदर्भात डांगर म्हणतात त्याचं नाव आलं की डोळ्यासमोर कशी रस्सेदार चमचमीत भाजी येते तेच त्याला pumpkin म्हंटलं तर कदाचित pumpkin pie वगैरे पदार्थ डोळ्यासमोर येतील.अजून काही उदाहरणं घायची झाली तर बघा रणांगण की battlefield काय आवडतं आहे हम्मा की cow लवकर लवकर जेव  की  finish your lunch fast   प्रभू श्रीरामचंद्र की lord rama आई की mummy अशे कितीतरी रोजच्या वापरातले शब्द आहेत जे आपण विसरत चाललो आहे, तुम्हीच आठवून बघा..मुद्दा एवढाच आहे की भाषा आणि संस्कृती ह्याचा खूप जवळचा संबंध आहे.. आणि म्हणूनच विस्मरणात चाललेले काही शब्द आणि त्याच्या बद्दलच्या गप्पा करायला येत आहोत आपल्या पॉडकास्ट मध्ये..Background Music for all episodes credit  One Small Rover by Alexander Nakarada https://www.serpentsoundstudios.comMusic promoted by https://www.freestockmusic.comAttribution 4.0 International CC BY 4.0https://creativecommons.org/licenses/by/4.0/

Language

English

Genre

Arts

Seasons

1